महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील चर्मोद्योगातील चर्मकार समाजाच्या नवउद्योजकांना व चर्मोद्योगास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. इटलीमधील मिलान येथे १२४ व्या एमआयपीईएल प्रदर्शनात राज्यातील कोल्हापुरी चप्पल व चर्मवस्तू यांची मागणी नोंदविण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या सुवर्णजयंती वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळाने दि. १७ ते २० सप्टेंबर या कालावधीत मिलान (इटली) येथील १२४ व्या एमआयपीईएल प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. राज्याच्या वतीने प्रथमच चर्मोद्योगातील चर्मकार समाजाच्या नवउद्योजकांना या प्रदर्शनात सहभागी करण्यात आले आहे.
या प्रदर्शनामध्ये महामंडळाने उत्पादित केलेल्या कोल्हापुरी चप्पल ला प्रचंड मागणी आहे. तसेच मुंबईतील धारावी येथील कारागिरांनी तयार केलेल्या महिला बॅगना सुद्धा चांगली मागणी आहे. नुकतेच महामंडळाच्या प्रयत्नातून कोल्हापुरी चप्पलसाठी जीआय टॅग मिळाला असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोल्हापुरी चप्पलची निर्यात मोठ्या प्रमाणात होण्यास चालना मिळणार आहे.
या प्रदर्शनात महामंडळाच्या वतीने स्टॉल लावण्यात आला असून या स्टॉलला महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. धम्मज्योती गजभिये यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान गजभिये सरांनी कोल्हापूर चप्पलची जास्तीत जास्त विक्री होण्यासाठी विपणन व प्रसार करावे, असे सांगितले. नंतर त्यांनी प्रदर्शनातील चर्मवस्तू व पादत्राणांच्या इतर विविध स्टॉलला भेट देऊन अशाच प्रकारची उत्पादने महामंडळाच्या उत्पादन केंद्रात तयार करावीत अशा सूचना संबंधिताना दिल्या.